कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गरिबी रेषेखालील कुटुंबातील सदस्यांच्या नातलगांना 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरिबी रेषेखालील कुटुंबातील ज्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी नुकसान भरपाई मिळण्याकरिता तालुका कार्यालय किंवा स्थानिक मुख्य सरकारी कचेरीमध्ये नमुना -1 अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. सदर अर्ज भरून त्या अर्जा सोबत निधन पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचा पुरावा देणारी आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तालुका कार्यालय किंवा स्थानिक मुख्य सरकारी कचेरीमध्ये जमा करावयाचा आहे.
नुकसान भरपाई मिळविण्यासाठी अर्जासोबत मान्यताप्राप्त डॉक्टरांचे सहीशिक्का असलेले कोरोना पॉझिटिव्ह /निगेटिव्ह प्रमाणपत्र, रुग्णांचा क्रमांक आणि मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सहीशिक्का असलेला क्लिनिकल आणि प्रयोग शाळेचा दाखला,
याबरोबरच मृत व्यक्तीचे आधार कार्ड, मृत्यू दाखल्याच्या झेराॅक्स प्रती, अर्जदाराच्या बीपीएल कार्डाच्या प्रति, आधार कार्डाच्या प्रती आणि बँक पासबुकच्या झेराॅक्स प्रतिंसह अर्जदारांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र (नमुना क्र. 2) यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे.
तरी गरिबी रेषेखालील ज्या कुटुंबांच्या घरातील व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले असेल त्यांनी नुकसान भरपाईसाठी अवश्य अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी केले आहे.