बेळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी बेळगाव महानगरपालिका नव्या उत्साहाने पुढे सरसावली असून यासाठी आणखी 15 भूमिगत कंटेनरसह ऑटो टिप्पर, ई -व्हेईकल्स व स्टेनलेस स्टील डस्टबिन खरेदी केली जाणार असून या सर्वांसाठी 1 कोटी 31 लाख रुपयांची एकत्रित निविदा महापालिकेने काढली आहे.
बेळगाव शहरात बसवण्यासाठी आणखी 15 भूमिगत कंटेनर्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या मंगळवारी निविदा काढण्यात आल्या असून ही निविदा प्रक्रिया 12 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर भूमीगत कंटेनर बसविण्याचा निर्णय घेत एक भूमिगत कंटेनर खरेदी केला आहे. संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर ही देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात नव्या 15 कंटेनर्ससाठी जागाही निश्चित केली जाणार आहे. बेळगावात बसविल्या जाणाऱ्या भूमिगत कंटेनर्ससाठी 41 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
याव्यतिरिक्त महापालिकेकडून आणखी ऑटो टिप्परही खरेदी केले जाणार असून त्यासाठी 72 लाख 50 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी हे ऑटो टिप्परचा वापर केला जाणार आहे.
सध्या महापालिकेकडे जे टिप्पर आहेत ते चालविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर चालक नियुक्त केले जाणार आहेत. याखेरीज दोन कंपार्टमेंट असलेल्या ई -व्हेइकल्सची खरेदीही केली जाणार आहे. या वेईकल्स वर 14 लाख 14 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
त्याचप्रमाणे 3 लाख 80 हजार रुपये खर्चून शहरात नव्याने स्टेनलेस स्टीलचे डस्टबीन बसविले जाणार आहेत. एकंदर या सर्वांसाठी 1 कोटी 31 लाख रुपयांची एकत्रित निविदा महापालिकेने काढली आहे.