बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचीचे उल्लंघन करणारी सदोष झाली आहे. लोकशाहीचे अधिकार हिरावून घेणारी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून व्हीव्हीपॅट मशीन अथवा बॅलेट पेपरद्वारे पुनश्च निवडणूक घेतली जावी, अशी जोरदार मागणी महापालिका निवडणूक रिंगणातील पराभूत उमेदवार व मतदारांनी केली आहे.
लोकशाहीची मुल्य पायदळी तुडवत घेण्यात आलेली बेळगाव महापालिकेची निवडणूक रद्दबातल करावी, अशी मागणी निवडणूक रिंगणातील पराभूत उमेदवार व मतदारांनी केली असून तशा आशयाचे निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. बेळगाव महापालिकेची निवडणूक पारदर्शी झाली नसल्याचा पराभूत उमेदवार यांचा आरोप आहे. निवडणूक प्रक्रिया खूप कमी वेळात पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2013च्या निकालानुसार जर निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन वापरात असेल तर त्याला व्हीव्हीपॅट मशीन जोडणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र महापालिका निवडणुकीत ते मशीन जोडण्यात आले नव्हते. यासंदर्भात गेल्या 31 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याखेरीज शेकडो मतदारांची नांवे मतदार यादीतून गहाळ झाली आहेत. बऱ्याच ठिकाणी बोगस मतदानाचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नसलेल्या तसेच मृत व्यक्तींच्या नांवे मतदान झाले आहे. कांही प्रभागांमध्ये महापालिका क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायत व्याप्तीतील मतदारांनी मतदान केले आहे. एकंदर ही निवडणूक पारदर्शी झालेले नाही. तेंव्हा मुख्य निवडणूक अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून निवडणूक प्रक्रियेतील ज्या त्रुटी दाखवून देण्यात आल्या आहेत त्यांचे लेखी स्पष्टीकरण द्यावे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी रास्त असतील तर ही निवडणूक रद्दबादल करून पुनश्च निवडणूक घ्यावी आणि तोपर्यंत नव्या सभागृहाच्या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. मात्र नुकतीच झालेली बेळगाव महापालिकेची निवडणूक लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवणारा ठरली आहे. ही निवडणूक म्हणजे मनोरंजन नव्हे तर लोकशाहीची सर्वात मोठी प्रक्रिया आहे. तथापि मनपा निवडणुकीत लोकशाहीने जनतेला दिलेला अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. जर सरकार याबाबतीत कोणतीही कारवाई करत नसेल तर त्याचा अर्थ सरकार आणि निवडणूक आयोग संगनमताने लोकशाहीचा, संविधानाचा अपमान करत आहेत असा होतो असे पराभूत उमेदवारांनी निवेदन सादर करताना स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीसाठी वापरलेली ईव्हीएम मशीन जपान, जर्मनी, अमेरिका यासारख्या विकसित देशांनी नाकारलेली आहेत. भारत हा एकमेव देश आहे जो विकसनशील असूनही ईव्हीएम मशीनचा वापर करतो आहे. हा प्रकार प्रादेशिक पक्ष व संघटनांना संपविण्यासाठी केला जात आहे. तेंव्हा ईव्हीएम मशीन न वापरता थेट बॅलेट पेपरद्वारे पुनश्च बेळगाव महापालिका निवडणूक घेतली जावी, अशी मागणीही मनपा निवडणूक रिंगणातील पराभूत उमेदवारांसह मतदानापासून वंचित राहिलेल्या समस्त मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी केली आहे.