नॅशनल इन्स्टिट्यूश्नल रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मानांकनामध्ये यावर्षी देखील आयआयटी मद्रासने आपले पहिले स्थान अबाधित राखले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ श्रेणीमध्ये आयआयएससी बेंगलोर पुन्हा एकदा अग्रस्थानी आहे असून महाविद्यालय श्रेणीत दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउस कॉलेजची सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी 2021 या वर्षासाठी एनआयआरएफ मानांकनं जाहीर केली आहेत. या मानांकनामध्ये बेळगावच्या पाच शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. सदर मानांकनात राष्ट्रीय स्तरावर आयआयटी मद्रास पहिले तर आयआयएससी बेंगलोरला दुसरे आणि आयआयटी मुंबईला तिसरे स्थान मिळाले आहे. विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये पुन्हा एकदा आयआयएससी बेंगलोर अग्रस्थानी असून दुसऱ्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आहे तर बनारस हिंदू विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळविला आहे. इंजिनियरींग च्या पहिल्या दहा महाविद्यालयांमध्ये 8 आयआयटी आणि 2 एनआयटीचा समावेश आहे. एम्स दिल्लीला देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयाचा मान मिळाला आहे.
विद्यापीठ श्रेणीत बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाला (व्हीटीयु) 82 व्या, तर केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला 91 व्या मानांकनावर समाधान मानावे लागले आहे इंजिनीअरिंग श्रेणीमध्ये बेळगावचे व्हीटीयु 57 व्या क्रमांकावर आहे.
फार्मसी श्रेणीमध्ये केएलई कॉलेज ऑफ फार्मसीला 40 वे मानांकन मिळाले आहे. बेळगावचे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय (जेएनएमसी) मेडिकल श्रेणीमध्ये 47 व्या स्थानावर असून केएलई विश्वनाथ कत्ती इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स हे महाविद्यालय डेंटल श्रेणीमध्ये 33 व्या स्थानावर आहे.
गेल्या 29 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी एनआयआरएफ मानांकनाची सुरुवात केली होती. या मानांकनाची पहिली यादी गेल्या 4 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तेंव्हापासून दरवर्षी शिक्षण मंत्रालय हे मानांकन जाहीर करत असते शैक्षणिक संस्थांना विविध मानदंडानुसार कामगिरीच्या आधारावर राष्ट्रीय मानांकन दिले जाते.