प्रकाश बेळगोजी हा सामान्य पत्रकार समाजसेवेची तळमळ घेऊन राबत आहे. एक साधा पत्रकार ते संपादक म्हणून काम करताना त्याने अनेक हिताची कामे केली आहेत. त्याची ही तळमळ कौतुकास्पद आहे.असे मत माजी महापौर नागेश सातेरी यांनी व्यक्त केले.
बेळगाव live आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात संपन्न झाला. या निमित्ताने नूतन नगरसेवकांचा आणि कोरोना योद्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी महापौर नागेश सातेरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रायोजक जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल उपस्थित होते.व्यासपीठावर श्रीरामसेना हिंदुस्थान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर,शिवसेना आरोग्य शाखेचे प्रमुख दत्ता जाधव, डॉ भूषण सुतार व डॉ. सुहास पाटील नूतन नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी स्वागत केले.मागील पाच वर्षात बेळगाव live ने राबविलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सत्कारमूर्तींच्या कार्याचा परिचय करून दिला.
कोरोना काळात उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल श्रीरामसेना हिंदुस्थान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर (कोरोना कार्य श्रीराम सेना हिंदुस्थान),शिवसेना आरोग्य शाखेचे प्रमुख दत्ता जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, डॉ भूषण सुतार व डॉ. सुहास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नूतन नगरसेवकांचा शाल,श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर उत्कृष्ट सेल्फी बद्दल स्पर्धकांना बक्षिसे वितरित केली. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.पियुष हावळ यांनी आभार मानले.
https://www.instagram.com/p/CT7ZzvOB3y5/?utm_medium=copy_link