उत्तर कर्नाटकातील वैशिष्टपूर्ण असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची सांगता रविवारी म्हणजेच अनंतचतुर्दशीने झाली. यंदा कोरोनाच्या छायेखाली असलेला हा उत्सव निर्बंधाच्या चौकटीत साजरा करावा लागल्यामुळे मंडळांमध्ये नाराजी होती. परंतु त्यांनी उत्सवाची धार्मिक परंपरा आणि पावित्र्य राखून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात श्री गणरायाला निरोप दिला. श्री गणेश विसर्जनाचा एकंदर वेग पाहता मध्यरात्रीपर्यंत शेवटच्या सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होईल असा अंदाज आहे.
पोलीस प्रशासनाने आज श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी लवकरात लवकर श्रीमूर्ती विसर्जन करा असे सांगितल्याने विसर्जन तलावावर सकाळी 10 पासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे आगमन होऊ लागले. भातकांडे गल्लीच्या मंडळाने सर्वप्रथम कपिलेश्वर तलावांमध्ये श्री मूर्तीचे विसर्जन केले. त्यानंतर दिवसभरात अनेक श्री मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सकाळच्या सत्रात प्रामुख्याने घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडले तर दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री मूर्तींचे विसर्जन केले. यंदा कपिलेश्वर येथील दोन्ही तलाव मराठा मंदिरनजीकचा जक्केरीहोंड येथे श्री मुर्तींचे विसर्जन झाले. घरगुती मूर्तींचे किल्ला तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले तर अनगोळ आणि जुने बेळगाव येथे श्री मूर्ती विसर्जनासाठी विहिरी एवजी स्वतंत्र विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबई पुण्यानंतर सर्वात मोठा गणेशोत्सव हा बेळगाव मध्ये साजरा करण्यात येतो. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून हा उत्सव निर्बंधांचा चौकटीत साजरा करावा लागत आहे. यंदाही श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्याबरोबरच श्री विसर्जनासाठी फक्त दहा गणेश भक्तांना जाण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे सकाळच्या सत्रात तलावांच्या ठिकाणी फारशी गर्दी पहावयास मिळाले नाही दुपार नंतर मात्र विसर्जन तलाव गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते शहरातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती असणाऱ्या झेंडा चौकातील गणपतीचे दुपारी फटाक्यांची आतषबाजी करत कपिलेश्वर तलावात विधीवत विसर्जन करण्यात आले.
यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनानिमित्त तब्बल 117 वर्षांची परंपरा असलेल्या झेंडा चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिधान केलेला पारंपारिक धोतर पगडी पोषाख सार्यांचे लक्ष वेधून घेत होता.
शहरातील विसर्जन तलावांवर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची तसेच इतर व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी आज दुपारनंतर मंडपाबाहेर काढण्यात आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या गणेश मूर्ती घेऊन फटाक्यांची आतषबाजी करत तलावाच्या ठिकाणी येताना दिसत होते. दुपारपासून सायंकाळपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मंडपाबाहेर काढण्यात येत असल्यामुळे शहरातील शेवटच्या सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे विसर्जन होण्यास मध्यरात्र होईल असा अंदाज आहे.
श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी शहर आणि तालुक्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परजिल्ह्यातूनही अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली होती. बंदोबस्तासाठी एकूण 1200 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याखेरीज पोलिसांची होयसाळ व शक्ती वाहने सातत्याने गस्तीवर होती. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह साध्या वेशातील पोलिसांची सर्व घडामोडींवर नजर होती.