बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आज झाली. वेगवेगळ्या कारणांनी ही निवडणूक गाजली पक्षीय सहभाग, चढाओढ आणि बरेच काही या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. निवडणुकीचा टक्का घसरला आणि आता आकडेवारीत कोण पुढे येणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय पक्षांची निराशा करणारी आकडेवारी समोर आली असून आता सर्वच पक्षांच्या नेत्यांची निकालापर्यंत झोप उडणार आहे.
काय आहे टक्केवारी?
प्रशासनाने संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेऊन मतदानाची टक्केवारी काढली आहे. यावर्षी एकूण मतदारांपैकी फक्त 50.41 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. मागील अर्थात 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत 60.85 टक्के इतके मतदान झाले होते. मागच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 5 टक्क्यांनी खाली घसरली आहे.
खरेतर सर्व पक्षांचे राबणे, त्यांच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरून केले गेलेले कॅम्पेनिंग आणि केलेला एकूण खर्च पाहिला तर हा टक्का वाढायला पाहिजे होता.सर्वच पक्षांनी आपल्या बड्या नेत्यांना पाचारण करून निवडणुकीची गर्मी वाढविण्याचा केलेला प्रयत्न पाहता आजची मतदानाची टक्केवारी वाढायला हवी होती. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांनी उत्साह दाखवला नाही. यामुळे निराशाजनक टक्केवारी पाहायला मिळाली.
वॉर्ड फेर रचनेमुळे आपले मतदान कुठे आहे याची माहिती अनेकांना नव्हती. हजारोंची नावे मतदार यादीत मिळाली नाहीत ही दोन कारणे ही टक्केवारी घसरण्यासाठी कारणीभूत धरता येतील पण इतर अनेक कारणेही आहेत. प्रमुख कारण म्हणजे विकास म्हणजे नेमके काय असते असा प्रश्न पडलेल्या जनतेने भकास चित्र निर्माण करणाऱ्या व्यक्तींना मतदान करण्यापेक्षा घरीच बसणे पसंद केले असावे हे वरकरणी दिसून येते. राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार निवडीच्या बाबतीत अनेक घोळ केले. पक्षात पूर्वापार राबणारे अनेक जण नाराज झाले याचाच फटका बसल्याचे नजरेस पडते.
एकूण मतदानाचा आढावा घेतला तर वॉर्ड क्र.48 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 70.46 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी म्हणजेच 23.89 टक्के मतदान वॉर्ड क्र. 26 मध्ये झाले आहे.
महागरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घसरलेली ही टक्केवारी पाहता आपण मतदारांना दोष द्यावा की राजकारणी लोकांनी निर्माण केलेल्या परिस्थितीला हे कळत नाही.
लोक का पडले नाहीत बाहेर?
बेळगाव live ने निवडणुकीचा सविस्तर अभ्यास केलाय. निवडणूक मराठी अर्थात म ए समिती विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी झाली. पण निवडणुकीत सहभागी उमेदवार,त्यांचे समर्थक आणि मराठी व कन्नड अस्मितेशी तसेच पक्षीय भावनांशी जोडले गेलेले लोक वगळता इतर नागरिकांना या निवडणुकीत जास्त स्वारस्य नव्हते हेच या निवडणुकीच्या टक्केवारीत दिसून आले आहे. प्रत्येक नागरिक झपाटल्याप्रमाणे आला आणि मतदान करून गेला असे चित्र या टक्केवारीतून दिसत नाही. यामुळे कदाचित निवडणुकीत राबलेल्या सर्वांचीच निराशा करणारा आकडा हाती आला आहे. मतदानाचा टक्का वाढला की चांगली माणसे निवडून येतात असे म्हटले जाते. आणि घसरला की निवडून आलेल्या प्रत्येकाला पुढची पाच वर्षे चांगलेच म्हणावे लागते. यामुळे निकाल लागेल तेंव्हा नक्की कोण कुठल्या वॉर्डात निवडून आला हे नक्की कळणार असे म्हणून सहा तारखे पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल.
अंदाज काय?
भाजप- 10 ते 15 जागा
काँग्रेस -9 ते 14 जागा
मराठी भाषिक आणि समिती-25 ते 30 जागा
अपक्ष व इतर- 4 ते 6 जागा
सध्याच्या परिस्थितीत वरचा अंदाज व्यक्त करायला जागा आहे. पक्षीय चिन्हांवर निवडणूक लढवण्याने मराठी माणसाचे काहीच नुकसान होणार नाही. राष्ट्रीय पक्षात गेलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतके मराठी आणि कन्नड माणसेच विभागली गेली आहेत. आपल्या मनात जो पक्ष त्या पक्षाच्या उमेदवाराला मत अशा वातावरणात कन्नड माणसाला मराठी उमेदवार तर मराठी माणसाला कन्नड उमेदवार निवडावा लागला आहे. समितीने सर्व मराठी भाषिक उमेदवार दिले कारण ते धोरणच आहे आणि त्यांचे मतदार समिती निष्ठावंत व मराठीच आहेत यामुळे आता समिती आणि इतर मराठी अपक्षांना इतर कन्नड मते किती पडली यावरुन त्यांचे मताधिक्य ठरणार आहे.
राष्ट्रीय पक्षांनी यावेळी पक्षीय चिन्हांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असा अंदाज यापूर्वीच बेळगाव live ने व्यक्त केला होता. मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत असे वातावरण आजच्या निवडणुकीने स्पष्ट केले असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.