मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्यापासून दोन दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमांच्या पूर्वतयारीची आज जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पाहणी केली.
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उद्या शनिवारी आणि परवा रविवारी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शहरातील ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत, त्या कार्यक्रमांच्या ठिकाणी आज शुक्रवारी भेट देऊन पूर्व तयारीची पाहणी केली. शहापूर येथील शिवाजी उद्यान नजीकचे देशप्रेमी वीर रवींद्र कौशिक ई -ग्रंथालय आणि टिळकवाडी येथील नूतन महात्मा फुले उद्यान याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे प्रकारची गैरसोय होऊ नये यादृष्टीने तयारी करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी व इतर अधिकारी उपस्थित होते.
या व्यतिरिक्त सावगाव रस्त्यावरील सुरेश अंगडी एज्युकेशन फौंडेशनच्या आवारात आयोजित केल्या जाणाऱ्या दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा आणि व्यवस्थेबाबत संयोजकाची चर्चा केली.