बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात सध्या निर्माण झालेला चिखल आणि पाण्याच्या डबक्यांमध्ये चक्क होडी -होडी, कू -गाडी, गाडी -गाडी सारखे लहान मुलांचे खेळ खेळणाऱ्या कांही युवकांनी आज साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ही होती बीएसएन रेजिमेंट या संघटनेने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक आवाराच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेली गांधीगिरी.
स्मार्ट सिटीच्या नांवाखाली राबविण्यात येत असलेल्या विकासकामांमुळे बळगावचे मध्यवर्ती बस स्थानकाची नूतनीकरण होण्याऐवजी सध्या त्याची पार दुर्दशा झाली आहे. बसस्थानक आवारात पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
त्याचप्रमाणे ठिकाणी लहान-मोठी गढूळ पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. प्रवाशांना चिखलाने माखलेल्या आणि गढूळ पाण्याच्या डबक्यांनी ग्रासलेल्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक आवारात वावरताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार आवाज उठवून, तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
याची दखल घेऊन शहरातील बीएसएन रेजिमेंट या युवा संघटनेने बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिनव शक्कल लढविली. या संघटनेच्या सदस्यांनी आज बसस्थानक आवारातील चिखल आणि डबक्यांमध्ये चक्क होडी -होडी, कू -गाडी, गाडी -गाडी सारखे लहान मुलांचे खेळ खेळण्यास सुरुवात केली.
आपल्या या गांधीगिरीद्वारे त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक आवारातील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे प्रशासनाने बसस्थानक आवारातील खड्डे -डबकी बुजवून नयेत, जेणेकरून आम्हाला वरचेवर या ठिकाणी येऊन होडी -होडी, कू -गाडी, गाडी -गाडी सारख्या लहान मुलांच्या खेळांचा आनंद लुटता येईल, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. बीएसएन रेजिमेंटच्या या गांधीगिरीत वरूण कारखानीस, किशोर ठाकूर, प्रमोद कदम आणि सिद्धार्थ या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.