बेळगाव महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे लक्ष लागून राहिले आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी येण्यासाठी मराठी भाषिकांनी ही निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. तेंव्हा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या विनंतीचे कदर करून प्रत्येक वॉर्डात समितीचा एकच उमेदवार द्यावा, असे जाहीर आवाहन येळ्ळूर विभाग म. ए. समितीने केले आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुका येत्या 3 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत. त्याअनुषंगाने बहुसंख्य मराठी भाषिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रत्येक वार्डात म. ए. समितीचा एकच उमेदवार असावा, अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीची कदर करून आणि वार्डातील पंचमंडळीना विश्वासात घेऊन प्रत्येक वार्डात म. ए. समितीचा एकच उमेदवार असावा, ही नम्र विनंती.
सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी येण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता राहणं गरजेचे आहे. बेळगावच्या निवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे लक्ष आहे. तेंव्हा गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांनी ज्याप्रमाणे एकजूट दाखविली तशीच एकजूट या महानगरपालिका निवडणुकीत दाखवावी, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष
शांताराम कुगजी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी आणि कार्यकारिणीने केले आहे.