राज्यातील नाईट कर्फ्यूसह सीमावर्तीय जिल्ह्यांमधील वीकेंड कर्फ्यूची सध्याची मार्गदर्शक सूची यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने शनिवारी घेतला आहे. याचा अर्थ बेळगावचा वीकेण्ड कर्फ्यू यापुढे देखील सुरूच राहणार आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीला आज सोमवारपासून प्रारंभ होणार असल्यामुळे कर्फ्यू संदर्भातील सरकारच्या निर्णयाचा निवडणूक आणि प्रचारावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.
बेळगावात जीनोम टेस्टिंग लॅब (जनुकीय तपासणी प्रयोगशाळा) येत्या तीन आठवड्यात सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना व्यवस्थापनासाठी नवे निर्बंध आणि लाॅक डाऊनसाठी राज्यव्यापी आदेशाची वाट न पाहता स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्याचे ठरले आहे.
दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याचे कोरोना तांत्रिक सल्लागार समितीचे मत असल्यामुळे राज्य सरकारने जिल्हास्तरीय विशिष्ट योजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी न होता तो 1600 ते 1800 दरम्यान रेंगाळत असल्यामुळे तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची पहिली लाट संपुष्टात आली त्यावेळी रुग्ण संख्या प्रति दिन 300 इतकी कमी झाली होती.
सरकारने कोरोनाचा नवा व्हेरीअंट (नवे रूप) शोधून काढण्यासाठी राज्यात 6 जिनोम टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगलोर, म्हैसुर, शिमोगा, कलबुर्गी आणि बेळगाव येथे येत्या तीन आठवड्यात या लॅब सुरू केल्या जाणार आहेत.
राज्यातील शाळा पुनश्च सुरू करण्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग 23 ऑगस्टपासून दोन बॅचेस अर्थात तुकड्यांमध्ये अल्टरनेटिव्हली सुरू होतील. शाळा सुरू झाल्यानंतर कोणती खबरदारी घ्यायची आणि किती विद्यार्थ्यांना परवानगी द्यायची याची मानक कार्यपद्धत (एसओपी) तयार करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.