देशातील सर्वात मोठ्या तांत्रिक विद्यापीठांपैकी एक असणारे बेळगावातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयु) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याला कारण येथील वित्त अधिकारी असून सरकारकडून बदलीचा आदेश येऊन 3 आठवडे उलटले असताना आणि उत्तराधिकारी तयार असताना या अधिकाऱ्याला अद्याप सेवेतून मुक्त होता आलेले नाही.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठामध्ये गेली 5 वर्षे वित्त अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सपना एम. ए. यांची एका आदेशाद्वारे गेल्या 26 जुलै रोजी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये (बीम्स) त्यांची बदली केली आहे. तसेच त्यांच्या जागी गदग जिल्हा पंचायतीचे वित्त अधिकारी जे. सी. प्रशांत यांची बदली करण्यात आली आहे. आता तीन आठवडे उलटून गेले असून सपना या आपल्याकडील अधिकार पदाची सूत्रे हस्तांतरित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गेली अनेक वर्षे व्हीटीयुमध्ये काम करणाऱ्या सपना आपली बदली रद्द करून व्हीटीयुमध्येच कार्यरत राहण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे जे. सी. प्रशांत यांना सध्या ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या सेवेतून मुक्त करण्यात आलेले नाही. सपना यांना सध्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या वैधानिक अधिकाऱ्याने घ्यायचा असतो. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे सरकारी आदेश येऊन 3 आठवडे उलटले तरी वैधानिक अधिकारी आणि उपकुलगुरू यांनी अद्यापही तो निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात उपकुलगुरूंशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.