गेले 9 महिने कारागृहात असणारे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची आज शनिवारी जामिनावर मुक्तता झाली असून नवलगुंद, धारवाड येथील त्यांच्या समर्थक आणि कुटुंबीयांनी त्यांचे हिंडलगा कारागृह येथे आज सकाळी भव्य स्वागत केले.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृह येथे आज शनिवारी सकाळी माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास बेळगाव ग्रामीणच्या आमदारांसह स्थानिक नेते मंडळी देखील उपस्थित होती. धारवाड जि. पं. सदस्य योगेशगौडा यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या विनय कुलकर्णी यांना गेल्या 9 महिन्यांपासून हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले होते.
कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी तसा आदेश कारागृह प्रशासनाला मिळाला नव्हता. त्यामुळे विनय कुलकर्णी यांची सुटका होण्यास एक दिवस विलंब लागला.
जामिनाचा आदेश कुलकर्णी यांच्या वकिलाकडे सुपूर्द करण्यात येताच त्यांनी तो स्पीड पोस्टद्वारे कारागृह प्रशासनाकडे धाडला. दरम्यान जामिनावर मुक्त होणाऱ्या विनय कुलकर्णी यांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक व कुटुंबीय अत्यंत उत्सुक झाले होते.
आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी आज शनिवारी सकाळी समर्थक मोठ्या संख्येने हिंडलगा कारागृहासमोर जमा झाले होते. कुलकर्णी कारागृहाबाहेर येताच त्यांनी जयजयकार करून जोरदार घोषणाबाजी केली.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर विनय कुलकर्णी यांनी खून प्रकरणातून आपण निष्कलंक बाहेर पडू असा विश्वास व्यक्त केला. तसेच यापुढे आपण वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाचा अवलंब करणार असल्याचे सांगितले.