कोरोना काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सकस आहाराची मोफत सोय करणाऱ्या व्ही बी पी फूड फॅक्टरीला उल्लेखनिय कामाबद्दल कौतुकाची थाप देण्यात आली आहे. मार्व्हलस बेळगाव या समूहातर्फे या समुहाला गौरविण्यात आले असून अशा प्रकारचे काम सातत्याने करीत राहण्याची प्रेरणा दिली आहे.
बेळगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विजय पाटील, भगवान वाळवेकर आणि म्हैसूर येथील हॉटेल व्यावसायिक प्रसाद यांनी एकत्रितरित्या व्ही बी पी फूड फॅक्टरी हा उपक्रम सुरू केला.
या माध्यमातून सर्वप्रथम इडली फॅक्टरी चा जन्म झाला. या फॅक्टरीत बनणारी इडली व डोसा घरोघरी जाऊन विकण्याची संधी अनेक बेरोजगार व होतकरू तरुणांना देण्यात आली. याच माध्यमातून अनेकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून तीन्नीरी हे हॉटेल सुरु करण्यात आले. यातच कोरोनाचा काळ सुरू झाला. याकाळात विविध इस्पितळे आणि आयसोलेशन सेंटर मध्ये शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अडकले गेले.
या व्यक्तींना लवकर बरे होण्यासाठी औषधांच्या बरोबरीनेच सकस आहाराचीही गरज होती. ही गरज मोफतरीत्या भागवण्यात आली.दररोज सकाळी 450 जणांना न्याहरी, दुपारचे व रात्रीचे जेवण अशा पद्धतीने दररोज 1350 ते 1500 फूड पॅकेट्स मोफत वाटण्यात आले.
याच कार्याची दखल घेऊन त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.