बेळगाव वडगाव ग्रामदेवता श्री मंगाईदेवी यात्रेचा आज मंगळवारी मुख्य दिवस आहे. यात्रेनिमित्त आज सकाळी निवडक मानकर्यांच्या उपस्थितीत देवीची मंदिरात सकाळी अभिषेक पूजा आरती सह गार्हाणे उतरवणे व ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी वडगावची ग्रामदेवता तसेच सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव पाटील गल्ली येथील श्री मंगाई देवीची यात्रा आजपासून साधेपणात साजरी होत आहे. यात्रेनिमित्त होणार्या गर्दीला आळा घालण्यासाठी मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी प्रशासनाचा आदेश आणि पुजारी मंडळाच्या निर्णयानुसार श्री मंगाई यात्रा रद्द करण्यात आली आहे. तथापी यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोहोबाजूंनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मंदिराकडे येऊन गर्दी केल्यास कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पुजारी मंडळाने यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रशासनानेही श्री मंगाई देवी यात्रेला परवानगी दिलेली नाही. यावर्षी मंगाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आल्याची कल्पना असली तरीही, आज मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची होणारी गर्दी शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनाने काल सोमवारपासूनच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स टाकून रस्ते अडविले आहेत. त्यामुळे आज मंगळवारी सकाळपासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर जागोजागी पोलिसांचा कडक चोख बंदोबस्त पहावयास मिळाला.
बंदोबस्तात असलेले पोलीस यात्रेसाठी मंदिराकडे जाणाऱ्यांना पुन्हा माघारी घरी पाठवत आहेत. परिणामी दर्शनासाठी आलेले भाविक दूरवरूनच देवीला हात जोडून परत जात आहेत. शहापूर पोलिस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्यासह पीएसआय मंजुनाथ नाईक, उदय पाटील व त्यांचे सहकारी मंदिर परिसरातील हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत. भाविकांनी मंदिराकडे जाण्याचे टाळावे असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे. भक्तांनी श्री मंगाई मंदिराकडे जाऊन गर्दी करण्याऐवजी घरात राहूनच पूजा आराधना करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.