मागील सहा महिन्यात कोविड लसीकरणाच्या बाबतीत कर्नाटक सरकारने अर्धा गड सर केला आहे. एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना आतापर्यंत लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. 2 कोटी 57 लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
लसीकरणाची पूर्ण जबाबदारी पूर्ण करण्यास राज्याला या वर्षी यश येणार नाही हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. उर्वरित सहा महिन्यांचा कालावधी आणि उर्वरित उद्दिष्ट लक्षात घेता पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी 2022 साल उजडणार असल्याची शक्यता व्यक्त झाली आहे.
आतापर्यंत राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 14.34 टक्के लोकांनाच दुसरा डोस मिळाला आहे.सर्वप्रथम सर्वांना पहिला डोस देऊन नंतर सर्वांना दुसरा डोस देण्यासाठी आणखी 12 महिने तरी लागतील अशी शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या मते लसीचा तुटवडा हेच प्रमुख कारण आहे. रविवारपर्यंत राज्यात 3 कोटी 29 लाख डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. यापैकी 2 कोटी 57 लाख ही संख्या पहिल्या डोसची आहे.
बेंगळुर शहर जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. या जिल्ह्यातील 91 लाख नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. गुलबर्गा जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण झाल्याची माहिती मिळाली आहे.