बेळगाव मनपा निवडणुकीसदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. यावर्षी सर्वप्रथम राष्ट्रीय पक्ष आपल्या चिन्हांवर ही निवडणूक लढवणार आहेत, या पार्श्वभूमीवर समितीचे धोरण काय असेल याची चिंता त्या पक्षांना लागली असून आता समितीनेही यावर ठोस चारचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मंगळवारी दिनांक 17 रोजी दुपारी 4 वाजता मराठा मंगल कार्यालय खानापूर रोड येथे बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रमुख मंडळी यांनी उपस्थित राहावे. अशी विनंती मध्यवर्ती म ए समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केली आहे.
गट तट आणि वेगळी वाट धरून मराठी उमेदवारात फूट पडणे यावेळी समितीला चालणार नाही. राष्ट्रीय पक्षांना पाणी पाजवणारे तगडे उमेदवार प्रत्येक वॉर्डात उभे करावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर समितीची होणारी ही बैठक महत्वाची ठरणार आहे.
आजवर स्थानिक पातळीवर काम करणारे उमेदवार उभे करून मनपावर मराठीचे अस्तित्व कायम राखण्याचे प्रयत्न समितीने केले आहेत. काही वेळा गट आणि तट पडून काही वॉर्ड हातातून घालावे लागल्याचे प्रकार झाले आहेत. यावेळी असा प्रकार होणे मराठी अस्तित्वाला परवडणारे नाही याची जाणीव ठेवून समिती नेत्यांना निवडणुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
मंगळवारी प्राथमिक धोरण ठरवून निवडणुकीत जोर घेतला जाण्याची शक्यता सध्या आयोजित बैठकीत दिसत असून सर्वसमावेशक निर्णयाची अपेक्षा जनतेत आहे.