अखिल विश्वातील सर्वात मोठा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा क्रीडा महोत्सव ‘ऑलिम्पिक’ सध्या टोकियोमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ही आहे की बेळगावच्या तीन नवोदित होतकरू महिला फुटबॉलपटूंची युक्रेनमध्ये या महिन्यात होणाऱ्या महिलांच्या कनिष्ठ विश्वचषक -2021 फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
अंजली हिंडलगेकर, आदिती जाधव आणि प्रियांका कंग्राळकर या त्या तीन फुटबॉलपटू आहेत, ज्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणार आहेत. या सर्वजणी शहरातील विविध महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी आहेत. या तिघींव्यतिरिक्त विभा आणि संजना या कर्नाटकातील बेंगलोर येथील दोघी जणींची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. एकंदर युक्रेन येथील कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील 11 खेळाडूंपैकी तब्बल 5 खेळाडू कर्नाटकातील असणार आहेत. विश्व चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशाच्या संघातील निम्मे खेळाडू आपले असणार ही बाब कर्नाटकसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
कर्नाटकच्या या सर्व फुटबॉलपटूंनी बेंगलोर येथे गेल्या जुलै महिन्यात आयोजित केलेल्या आठ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात खास प्रशिक्षण घेतले आहे. अंजली, आदिती आणि प्रियांका या बेळगाव युनायटेड फुटबॉल अकॅडमीमधून फुटबॉलचा सराव करतात आणि त्यांना प्रशिक्षक मतीन इनामदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बेंगलोर येथे अलीकडेच पार पडलेल्या सुपर डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये उल्लेखनीय खेळ केल्याबद्दल या तिघींची राष्ट्रीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे युक्रेन येथील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उद्या शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी या तिघी बेळगाव होऊन हैदराबादला रवाना होणार आहेत. हैदराबाद येथून अंजली, आदिती आणि प्रियांका या तिघीजणी युक्रेनला रवाना होणाऱ्या भारतीय संघात सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीला प्रयाण करतील.
केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयात बीकॉममध्ये शिकणाऱ्या अंजली हिंडलगेकर हिने भारतीय संघात सहभागी होण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. माझी निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या संदेशांचा जणू माझ्यावर पाऊस पडला. माझ्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात मी उत्तम कामगिरी बजावेन अशी मला आशा आहे आणि आम्ही सर्वजणी बेळगावला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नोंदवू, असे सांगितले. आदिती जाधव ही देखील लिंगराज महाविद्यालयाची बीएची विद्यार्थिनी आहे, तर अंकिता कंग्राळकर ही मेंगलोर विद्यापीठात बीकॉम शिकत आहे. युक्रेन येथे होणारी 23 वर्षाखालील महिलांची कनिष्ठ विश्वचषक -2021 फुटबॉल स्पर्धा ही सेव्हन -ए -साइड स्पर्धा असून ती येत्या 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाणार आहे.
बेळगावातील अनेक महिला खेळाडूंनी बेळगावचे नावं देशात उज्वल केलं आहे या तिघी कडून देखील तीच अपेक्षा आहे.
या तिघींना टीम बेळगाव live कडून शुभेच्छा..