बेळगाव महानगरपालिकेची यावेळीची निवडणूक कांही कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय पक्षांचा सहभाग आणि रिंगणातील सर्वाधिक उमेदवार या वैशिष्ट्यांसह महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन दाम्पत्य ही निवडणूक लढवत आहेत.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर रिंगणामध्ये आता 385 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये कांही ठिकाणी पती-पत्नी रिंगणात असल्याने उत्सुकता वाढली आहे. एकूण तीन जोडपी महापालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे. ही जोडपी निवडून आल्यास तो एक इतिहास ठरणार आहे.
या तीन जोडप्यांमध्ये विशेष म्हणजे माजी महापौर आणि उपमहापौर यांचाही समावेश आहे. माजी महापौर आप्पासाहेब पुजारी प्रभाग क्र. 41 मधून आणि त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर मधुश्री पुजारी प्रभाग क्र. 56 मधून निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्र. 3 मधून माजी उपमहापौर मीन वाझ व प्रभाग क्र. 4 मधून त्यांचे पती माजी नगरसेवक रायमल वाझ हे पुन्हा नशीब अजमावत आहेत.
त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 23 मधून माजी आमदार दिवंगत संभाजी पाटील यांची कन्या संध्या पेरनुरकर व प्रभाग क्रमांक 27 मधून त्यांचे पती नितीन पेरनुरकर निवडणूक रिंगणात आहेत.
या व्यतिरिक्त आणखी एका दाम्पत्याने अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील एकाने माघार घेतली आहे. माजी महापौर वंदना बेळगुंदकर यावेळी प्रभाग क्र. 33 च्या उमेदवार आहेत. त्यांचे पती माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर यांनी प्रभाग क्र. 34 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र गुरुवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन प्रभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. एकंदरीत यंदाची महापालिका निवडणूक विविध कारणाने गाजत आहे. पती-पत्नी दोघेही निवडणूक रिंगणात असल्यामुळे रंगत वाढली आहे.