कोरोनाची तिसरी लाट आलीच तर लागणाऱ्या आर्थिक खर्चाचे नियोजन कर्नाटक राज्य सरकारने केले आहे. 1471 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी करण्यात आली आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये जास्त परिणाम दिसणार आहे.ही शक्यता ओळखून राज्यभरात 3270 ते 4861 बाल चिकित्सा केंद्रे सज्ज करण्यात येणार आहेत.
दररोज येणाऱ्या हजारो कोरोना बाल रुग्णांवर उपचार करण्याची तयारी केली जात आहे. उपचार आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी लागणारा अपेक्षित खर्च करण्याची तयारी सरकार करत आहे.
कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दृष्टीक्षेपात खर्च हा अहवाल बनविला आहे.आगामी तिसऱ्या लाटेला तोंड देणारा कृती आराखडा असे नाव या अहवालाला देण्यात आले आहे. 640 कोटी सरकारी इस्पितळात बेड सुविधा सज्ज ठेवण्यासाठी वापरले जातील. यामध्ये 19 जिल्हा व इतर इस्पितळे तर 146 तालुका इस्पितळे समाविष्ट आहेत.
जिल्हा इस्पितळांमध्ये एच डी यु, आय सी यु आणि बाल चिकित्सा केंद्रे वाढविली जाणार आहेत.13280 डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या 12 महिन्याच्या वेतनासाठी 595 कोटी तर वैदयकीय साहित्यासाठी 236 कोटी राखीव ठेवले जाणार आहेत.ऑक्टोबर महिन्यापर्यंत तिसरी लाट अपेक्षित असल्याने तयारी सुरू झाली आहे.