बेळगाव शहरातील प्रमुख व्यापारीपेठ आणि स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब नरगुंदकर यांच्या नावचा असलेल्या नरगुंदकर भावे चौकाकडे आता पुन्हा एकदा काही महाभागांनी आपली वक्र दृष्टी वळलेली आहे. पुतळा उभारण्याच्या नावाखाली समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
हा चौक व्यापारासाठीचे केंद्र आहे. बेळगाव शहरातील एक प्रमुख चौक असून याठिकाणी काही चुकीचे घडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर दिसून येतो,असे असताना काही चुकीचे प्रयत्न केले जात असून यामागे भाषिक भावना दुखावण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी अनेक प्रकरणात पुतळा उभारण्याच्या नावाखाली भाषिक वाद निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रयत्नांनी सारे वातावरण गढूळ झाले होते, याचा विचार करून पोलिसांनी अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.कोरोनाचा काळ असल्याने बराच काळ त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यातच निवडणूक तोंडावर असून कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
गेल्या कांही दिवसापूर्वी सह्याद्रीनगर येथील उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यास आक्षेप घेऊन पोलिसांनी पुतळा आणि चौघा जणांना ताब्यात घेण्यासाठी 40 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकारामुळे शहरवासीय तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. आता नरगुंदकर भावे चौक येथे पुतळा बसविण्यासाठी काल रात्री पाहणी करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
मागील वर्षी मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्रीच्यावेळी हटविण्यात आल्यानंतर सीमाभागात त्याची तीव्र पडसाद उमटले होती. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी पिरनवाडी येथे संगोळी रायन्ना यांचा पुतळा अनधिकृतरित्या उभारण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. तसेच गेल्या वर्षीही 14 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी पुतळा उभारण्यात आला होता. काल रात्रीचा पाहणी करण्याचा प्रकार लक्षात घेता आज शनिवारी रात्री भावे चौकात रात्रीचा फायदा घेऊन पुतळा उभारण्यात येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी जागरूक राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसेनानी नरगुंदकर भावे यांना बेळगाव येथे फाशी देण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ अनेक वर्षापूर्वी नरगुंदकर भावे चौक येथे शहीद भावे यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला होता. शहरातील हा चौक व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असताना याठिकाणी भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने शहरवासीय तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, भावे चौकसंदर्भातील एकंदर प्रकारामुळे संबंधित परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भावे चौक परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. तथापि आज शनिवारी दुपारी त्या ठिकाणी चार-पाच कार्यकर्ते आल्यामुळे मराठी भाषिक देखील जमा झाले. परिणामी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र खडेबाजार पोलिसांनी आम्ही जबाबदारी घेतो, आम्ही या ठिकाणी पुतळा उभारण्यास परवानगी देणार नाही असे सांगून उपस्थित मराठी भाषिकांना आश्वस्त केले. त्यानंतर चौकातील गर्दी व तणाव निवळला.