बेळगाव येथील एम एल आय आर सी म्हणजे देशाची शान आहे. देश रक्षणात मराठा सैनिक घडवणाऱ्या या लष्करी प्रशिक्षण केंद्रात लवकरच देशातील सर्वाधीक 21 फूट उंचीचा अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहे.
जोधपुर जवळील शिकारगड येथे बनविण्यात आलेला हा भव्य स्तंभ काल बेळगाव कडे पाठविण्यात आला आहे.
देशात बेळगाव येथील लष्करी प्रशिक्षण केंद्राची ख्याती मोठी आहे.याच मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्रात चार लाख रुपये खर्च करून फायबर द्वारे बनवण्यात आलेला 21 फूटी उंच अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहे.अशी माहिती मिळाली आहे.
यापूर्वीचा देशातील सर्वाधिक उंचीचा अठरा फूट उंचीचा अशोक स्तंभ राजस्थानच्या जैसलमेर येथील शरदसिंग मैदानात उभारण्यात आला आहे.
त्यानंतर आता बेळगावच्या एम एल आय आर सी केंद्रात 21 फूट उंचीचा स्तंभ उभारण्यात येणार आहे. सदर स्तंभ बनविण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे.
तब्बल पंचवीस कारागिरांनी 21 फूट उंचीच्या अशोकस्तंभासाठी परिश्रम घेतले आहेत.या स्तंभाचे मुख्य कारागीर रणजीत सिंग राठोड यांनी या कामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सदर स्तंभ फायबरचा असल्यामुळे ऊन आणि पावसाचा त्याच्यावर कोणताच परिणाम होणार नाही.हा स्तंभ बेळगावची शान आणि मान वाढवणार हे नक्कीच.