दहावी परीक्षेचा निकाल लागला आणि एक वगळता सगळेच उत्तीर्ण झाले.कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळाने सुटकेचा निश्वास सोडला.आता विद्यार्थी पुढच्या कामाला लागले असे चित्र अजिबात नाही.
निकाल घोषित केल्यानंतर परीक्षा मंडळाची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.आम्हाला हा निकाल मान्य नाही, आम्हाला निकाल नाकारायचा आहे आणि सप्टेंबर मध्ये पुन्हा परीक्षेला बसायचे आहे अशी मागणी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे फोन परीक्षा मंडळाला येत आहेत.
निकालावर नाराज विद्यार्थी हे पाऊल उचलत असल्याने परीक्षा आणि निकालाचा फ्लॉप शो झाला आहे.
दहावीत विद्यार्थी ठराविक टक्केवारीचे ध्येय ठेऊन अभ्यास करतात.पण यंदा अचानक परीक्षेचे स्वरूप बदलले.सर्वजण पास झाले तरी अपेक्षित टक्केवारी मिळाली नाही.ज्यांना पास होण्याची खात्री नव्हती ते विद्यार्थी शांत बसले पण ज्यांना आपण इतके इतके मार्क मिळवणारच याची खात्री होती त्यांनी निकाल नाकारण्याचा निर्णय घेऊन तशी परवानगी देण्याची मागणी परीक्षा मंडळाकडे सुरू केली आहे, यामुळे मंडळ आणि सरकार अडचणीत आले आहे.
यावर्षी वेगळ्या मुद्द्यावर आणि पद्धतीने परिक्षा घेताना सरकारने सर्वांनाच पास करण्याचे धोरण ठेवले.यामुळे जे गुण देण्यात येतील तेच अंतिम असतील अशी तरतूद करण्यात आली.निकाल नाकारणे, फेर तपासणी आणि फेर मोजणी हे पर्यायच ठेवण्यात आले नाहीत.यामुळे या पर्यायासाठी नाराज विद्यार्थी शाळांना संपर्क करत आहेत.
शाळांनी हात वर केल्यानंतर विद्यार्थी परीक्षा मंडळाला दूरध्वनी करत असून मंडळाचा ताप वाढला आहे.