पबेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव त्रासदायक ठरत आहे. संपूर्ण शहरालाच या कुत्र्यांचा धोका वाढत आहे. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांचा सामना करत प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याचा लवकरच बंदोबस्त करण्याची गरज आहे.
मुख्य शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांची आकडेवारी वाढली आहे. प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर ही कुत्री दबा धरून बसू लागली असून वाहनधारकांचा पाठलाग करीत आहेत. रात्री सात ते आठ नंतर काही मार्गावरून या कुत्र्यांचा सामना करीत जाणे अवघड झाले असून अनेकदा बचाव करण्याच्या नादात वाहने जोरात चालवताना अपघात होत आहेत.
बेळगाव महानगरपालिकेने मध्यंतरी या कुत्र्यांना पकडून बाहेर नेऊन सोडण्याची मोहीम राबविली पण ती तितकी प्रभावी ठरलेली नाही.
![Street dogs](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/07/IMG-20200729-WA0106.jpg)
अनेक भागात अजूनही कुत्री शिल्लक आहेत. कुत्रे हा मुका प्राणी आहे. त्याच्या पोटाची व्यवस्था झाली नाही की तो प्राणी हिंस्त्र बनतो आणि माणसावर हल्ले करतो हा अनुभव अनेकदा बेळगावच्या नागरिकांना आलेला आहे.
कुत्र्यांनी हल्ला करून जीव गमावल्याच्या अनेक घटना बेळगाव शहरात घडलेल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी आत्ताच घेण्याची वेळ आली आहे. याचा विचार करून महानगरपालिका, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी योग्य बंदोबस्त करण्याची गरज आहे.