डोळ्यांना कमी दिसते म्हणून तो हरला नाही. त्याने जीवापाड मेहनत केली. शाळा नव्हती, परीक्षेचे संदर्भही बदललेले होते. तरीही तो यशस्वी झालाय.
बेळगाव येथील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेच्या या विद्यार्थ्याने 86.40 टक्के गुण मिळवले आहेत आणि तो दहावीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे.
श्रेयस महंतेश पाटील हे त्या विद्यार्थ्याचे नाव. त्याच्या या यशाने शाळा जास्त खुश झाली. त्याच्या पालकांना जितका आनंद झाला त्यापेक्षा अधिक आनंद त्याच्या शिक्षकांना झाला आहे.
श्रेयसची दृष्टी अंधुक आहे.
त्याला इतर मुलांच्या तुलनेत फक्त 20 टक्केच दिसते. तरीही तो अभ्यासात चिकाटीने प्रगती साधत आला आहे. मागील नववी आणि यंदा दहावीचे वर्ष कोरोनाच्या फटक्याने लॉक डाऊन मध्येच गेले.
तरीही शिक्षकांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेऊन तो इतर विद्यार्थ्यांच्या तोडीचा अभ्यास करीत राहिला. अखेर त्याने यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.