गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज सोमवारपासून पुन्हा एकदा इयत्ता नववी पासून ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यामुळे अखेर ऑफलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असून आज शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांचे आवार पुनश्च विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गजबजून गेलेले दिसून आले.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकर शाळा सुरू करण्याची मागणी वाढू लागल्यानंतर शिक्षण खात्याने कोरोना संदर्भातील सर्वती खबरदारी घेऊन पहिल्या टप्प्यात आजपासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. त्यानुषंगाने सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून शाळांमध्ये स्वच्छता व इतर प्रकारची कामे हाती घेण्यात आली होती. शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्यापूर्वी नियमावली घालून दिली आहे.
आजपासून शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयं सुरू झाल्यामुळे पूर्वीप्रमाणे त्यांच्या आवारामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी दिसून आली. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी सर्व शाळांमध्ये सकाळी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्याबरोबरच फेसमास्क आणि सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात आला.
विद्यार्थी-विद्यार्थिनींना रांगेने थर्मल स्क्रीनिंगनंतरच वर्गात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे प्रत्येक शाळा -महाविद्यालयांच्या आवारात आज सकाळी विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या रांगा पहावयास मिळाल्या. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. नोटीस बोर्डवरही ‘शाळेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे’ असा मजकूर लिहिण्यात आला होता.
दरम्यान, आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी कांही दिवस त्या अर्धा वेळ (सकाळी 10 ते दुपारी 1:30 वा. पर्यंत) भरणार असून ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात सहभागी होता येत नसेल असे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात.
सध्या अर्धवेळ शाळा असली तरी कालांतराने पूर्णवेळ शाळा सुरू करण्याचा विचार शिक्षण खात्याकडून केला जात आहे. राज्यात एकूण 16 हजार माध्यमिक शाळा असून 5000 पदवीपूर्व महाविद्यालय आहेत.
त्यामध्ये सुमारे 25 लाख विद्यार्थी -विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या सर्वांना 50 -50 टक्के इतक्या क्षमतेने दोन बॅचमध्ये ऑफलाइन शिक्षण दिले जाणार आहे.




