गेल्या मे महिन्यात सांवगाव येथे घडलेल्या खून प्रकरणातील मोकाट आरोपींना त्वरित गजाआड करून कठोर शासन करावे, अशी मागणी सांवगाव (ता. बेळगाव) येथील रहिवासी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सांवगाववासियांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सांवगाव (ता. बेळगाव) येथे गेल्या 21 मे 2021 रोजी सायंकाळी 7:15 वाजता खुनाचा प्रकार घडला होता. जयवंत गुंडोजी देसुरकर, समीर सुरेश देसुरकर, राहुल अर्जुन देसुरकर, सुरेश गुंडोजी देसुरकर, अर्जुन गुंडोजी देसुरकर, सागर अर्जुन देसुरकर (सर्व रा. बेनकनहळ्ळी) आणि अन्य 8 अज्ञातांनी सावगाव येथील कर्लेकर कुटुंबीयांच्या घरात घुसून रविंद्र नारायण कर्लेकर (वय 36) याचा निघृण खून केला होता.
या खुनी हल्ल्यात कर्लेकर कुटुंबातील अन्य सदस्य देखील जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी विजया हॉस्पिटल आणि केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या जखमींपैकी डोक्याला आणि शरीरावर अन्य ठिकाणी गंभीर इजा झालेल्या नारायण कल्लाप्पा कर्लेकर याचा उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला होता.
याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन देखील बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आजतागायत या प्रकरणाचा योग्य तपास केलेला नाही. आत्तापर्यंत त्यांनी 14 -15 आरोपींपैकी फक्त 6 जणांना ताब्यात घेतले आहे. मोकाट फिरत असलेले अन्य आरोपी गुंड प्रवृत्तीचे खुनशी असल्यामुळे कर्लेकर कुटुंबीय सध्या भीतीने जीव मुठीत धरून रहात आहेत.
गुंड प्रवृत्ती बरोबरच संबंधीत आरोपी हे आमच्या भागातील अत्यंत श्रीमंत आणि वर पर्यंत हात पोहोचलेले व्यक्ती आहेत. बहुदा त्यामुळेच दबावाखाली असलेल्या पोलिसांनी अद्याप इतर आरोपींना अटक केलेले नाही. तेंव्हा या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित आरोपींना तात्काळ गजाआड केले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
सदर निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि बेळगाव पोलीस आयुक्तांना धाडण्यात आले आहेत.