बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस होता. यामुळे प्रचंड गर्दी करून अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवार निवड याद्या उशीरा सादर झाल्यामुळे अनेकांनी सोमवारी ठीक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केंद्रात गर्दी केली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या मंगळवारी छाननी होणार आहे.
या छाननी प्रक्रियेत किती अर्ज शिल्लक राहतात यावरून या उमेदवारांचे निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे.
काँग्रेस पक्षाने काल रात्री आपली उमेदवारी यादी जाहीर केली. भाजपने यापूर्वी एक यादी जाहीर केली होती तर दुसरी यादी आज जाहीर केली यामुळे अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत होती.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना उमेदवारांना पंचमंडळ व वॉर्डातील प्रमुखांचे निर्णय मिळेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता आले नव्हते .मात्र सोमवारी काहींचे मार्ग खुले झाल्याने अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची गर्दी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केंद्रांवर होत होती.
मंगळवारी या संदर्भातील छाननी प्रक्रिया होणार असून अनेकांनी आपले डमी अर्जही सादर केले आहेत. त्यामुळे एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास त्याचा डमी उमेदवार निवडणुकीत सहभागी होऊ शकतो. सुरुवातीला अर्ज दाखल करण्यास भरपूर वेळ होता .मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक होणार की नाही? निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती मिळेल का? अशा पद्धतीच्या चर्चा आणि शक्यता निर्माण झाल्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले नव्हते.
याचबरोबरीने पक्षाकडून अधिकृतता आणि समितीकडून व पंचमंडळीची मान्यता वेळेत मिळत नसल्यामुळे सर्वच उमेदवारांची गोची झाली होती. मात्र सोमवारी अनेकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादी कडे नागरिकांचे लक्ष आहे. यावेळची निवडणूक राजकीय पक्ष विरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती अर्थात मराठी अशी होणार असल्यामुळे आणि खासदारकीच्या निवडणुकीत चांगली वातावरण निर्मिती झाल्यामुळे तसेच यावेळच्या निवडणुकीत वाद आणि फूट निर्माण होण्याला वाव न देता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक वार्डात एकच उमेदवार राहील या प्रकारचे नियोजन केल्यामुळे चांगलीच गाजणार व लक्षात राहणार आहे.
40 प्लसच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वच पक्षांचे, कर्नाटक राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
राष्ट्रीय पक्षांचा समावेश असला तरी राजकीय पक्षातील उमेदवारात निवडीच्या राजकारणातून मोठ्या प्रमाणात नाराजी, पक्षीय उमेदवार आणि त्यांचे समर्थक यातील नाराजीचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला वा संघटनेला होणार हे निवडणुकीच्या वेळी स्पष्ट होणार असून छाननी नंतरच या बद्दलचे खरे चित्र पाहायला मिळणार आहे.