घरची हालाखीची परिस्थिती, वडील अपंग असल्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात रंगकामाला जाणाऱ्या एका मुलाने परिस्थितीशी झगडत यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत चक्क 96.32 टक्के गुण संपादन करून परीक्षा केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविल्यामुळे हा एक कौतुकाचा विषय झाला आहे. सुदर्शन बसवंत राक्षे असे या गुणी विद्यार्थ्याचे नांव आहे.
कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील कलमेश्वर गल्लीतील बसवंत राक्षे यांचा धाकटा मुलगा सुदर्शन हा गावातील सरकारी मराठी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. राक्षे कुटुंबीयांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. बसवंत राक्षे हे अपंग आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि घरचा रहाट गाडा चालविण्यासाठी सुदर्शनची आई रोजंदारी कामाला जाते, तर मोठा भाऊ गवंडी काम करतो. सुदर्शनची मोठी बहीण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे कोणत्याही चांगल्या सोयीसुविधा नसताना देखील सुदर्शन राक्षे याने यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत 96.32 टक्के गुण संपादन करत ‘ए’ ग्रेड मिळविली आहे. त्याचप्रमाणे हिंडलगा परीक्षा केंद्रात तो पहिला आला आहे. परिणामी शाळेमध्ये आणि गावात त्याचे कौतुक होत आहे. एसएसएलसी सारख्या परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व सामान्यता मुले हरखून जातात. त्यांच्या घरी आनंदोत्सव साजरा केला जातो. तथापि घरच्या परिस्थितीमुळे दुर्दैवाने सुदर्शनच्या नशिबी मात्र यापैकी कांहीही नाही. परीक्षेचा निकाल जाहीर होताच घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आणि पुढील शिक्षणाची बेगमी करण्यासाठी त्याला कामाला जावे लागत आहे. घरांचे रंग काम करणाऱ्या पेंटर्सच्या हाताखाली तो काम करतो.
विद्यार्थीदशेत काम करण्याऐवजी शिक्षणाकडे अधिक लक्ष दे, असा सल्ला गावातील जाणकार मंडळी देत असली तरी घर खर्चाला मदत करण्यासाठी आपण काम करत असल्याचे सुदर्शन सांगतो.
सुदर्शन राक्षे याला शिक्षणाची आवड आहे. मात्र घरच्या परिस्थिती समोर तो हतबल आहे. सुदर्शन मधील प्रतिभा ओळखून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील यांनी त्याला आपल्याकडून शक्य होईल तितकी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि सुदर्शनला शिक्षणप्रेमी दानशूर नागरिकांच्या मदतीची गरज असून त्याच्या शिक्षणाचा खर्च कोणी उचलल्यास भविष्यात तो चांगला प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून नावारुपास येऊ शकतो, असे संजय पाटील यांच्यासह समस्त गावकर्यांचे मत आहे.