बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस होता. यामुळे प्रचंड गर्दी करून अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोमवारी एकाच दिवशी 434 अर्ज दाखल झाले असून एकूण 58 जागांसाठी कालपर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जाची संख्या 519 झाली आहे. निवडणुकीत सर्वाधिक 365 अपक्ष उमेदवार दाखल झाले आहेत.
सोमवारी काँग्रेस कडून 49 ,भाजपचे 58,जे डी एस चे 12 ,आपचे 28, प्रजाकीय पक्ष 1,एम आय एम 6 आणि इतर अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. आज दुपारी छाननी होणार आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवार निवड याद्या उशीरा सादर झाल्यामुळे अनेकांनी सोमवारी ठीकठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून आज या अर्जांची छाननी होणार आहे.
या छाननी प्रक्रियेत किती अर्ज शिल्लक राहतात यावरून या उमेदवारांचे निवडणुकीतील भवितव्य ठरणार आहे.
काँग्रेस पक्षाने रविवारी रात्री आपली उमेदवारी यादी जाहीर केली. भाजपने यापूर्वी एक यादी जाहीर केली होती तर दुसरी यादी सोमवारी जाहीर केली. यामुळे अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत होती.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना उमेदवारांना पंचमंडळ व वॉर्डातील प्रमुखांचे निर्णय मिळेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता आले नव्हते .मात्र सोमवारी अनेकांचे मार्ग खुले झाल्याने अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची गर्दी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केंद्रांवर होत होती.
पक्षाकडून अधिकृतता आणि समितीकडून व पंचमंडळीची मान्यता वेळेत मिळत नसल्यामुळे सर्वच उमेदवारांची गोची झाली होती. मात्र सोमवारी अनेकांचा मार्ग मोकळा झाला.