कर्नाटकातील मंत्री मंडळ स्थापनेची घटिका जवळ येत चालली असताना राज्यातील बहुतांश आमदार हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्ती असल्यामुळे आणि दुसरीकडे रमेश जारकीहोळी गटाच्या 17 आमदारांनी मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी कंबर कसली असल्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाची निवड करणे कठीण जात आहे.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात असणार्या अनेकांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता धुसर असताना 38 लिंगायत आमदारांपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) जोडले गेलेल्या बहुतांश आमदारांनी मंत्रिपदासाठी पक्ष नेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या हायकमांडने मागील मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान नसणार असल्याचे संकेत दिले आहेत तथापि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे आपले निकटवर्तीय असलेल्या प्रामुख्याने सी. सी. पाटील, उमेश कत्ती, जे मधूस्वामी, सुरेश कुमार, कल्लाप्पा आचार आणि तिप्परेड्डी यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.
ज्येष्ठ नेत्यांचा भरणा असणाऱ्या येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाच्या तुलनेत मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे पहावयास मिळतील अशी पक्षातील अनेक नेत्यांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे अनेक युवा आमदारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याच नेत्याला मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. जर भाजपने ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला तर जगदीश शेट्टर, के. एस. ईश्वरप्पा, उमेश कत्ती आणि श्रीमंत पाटील यांचा मंत्रिपदासाठीसाठी कदाचित विचार केला जाऊ शकणार नाही.
दरम्यान हावेरीचे नेहरू ओलेकर, रायबागचे दुर्योधन एहोळे, बेळगावचे महांतेश कवटगीमठ, ॲड. अनिल बेनके, अभय पाटील, महेश कुमठळ्ळी, पी. राजीव आणि आनंद मामणी या येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात नसलेल्या आमदारांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना अश्लील सीडी प्रकरणातून अद्याप क्लीनचिट मिळालेली नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांचे बंधू अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जावा अशी मागणी केली आहे.
एकंदर येडियुरप्पा यांना पदच्युत केल्यामुळे लिंगायत लॉबीची नाराजी ओढवून घेतलेले भाजपचे वरिष्ठ नेते येडियुरप्पा यांना पूर्णपणे बाजूला सारून आरएसएसशी संबंधी त्यांच्या नजीकच्या विश्वासू नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.