बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्र. 33 ज्योतीनगर येथील तब्बल 1500 मराठी भाषिक मतदारांची नांवे मतदार यादीतून गायब असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. यामुळे या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी मतदार यादीतील नांवे आणि परिसराचा थांगपत्ता नसल्याची बाब चव्हाट्यावर येत आहे. गोंधळी गल्ली, गणाचारी गल्ली परिसरातील कांही मतदारांची नांवे मतदार यादीत नसल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता ज्योतीनगर वार्ड क्रमांक 33 येथील तब्बल 1500 मराठी भाषिक मतदारांची नांवे मतदार यादीतून गाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार यादीतील आपली नांवे गायब असल्याचे पाहून संबंधित नागरिकांनी आज आपल्या नावांचा अन्य प्रभागांच्या यादीत शोध घेतला. तथापि संबंधितांची नांवे कोठेही आढळून आली नाहीत.
एपीएमसी मार्केट यार्डच्या मागील बाजूस असणाऱ्या प्रभाग क्रमांक 33 ज्योतीनगर येथील नागरिक बेळगाव महापालिकेकडे रीतसर पाणीपट्टी, घरपट्टी आदी सर्व कर भरतात. असे असताना मतदार यादीतून या ठिकाणच्या दीड हजार मराठी भाषिक लोकांची नांवे मतदार यादीतून गायब असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे जाणून बुजून नांवे गाळण्याचा हा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे.
तब्बल दीड हजार मतदारांची नांवे यादीत नसल्यामुळे याचा प्रतिकूल परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ संबंधित यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट केली जावीत अथवा मनपा निवडणूक पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
नाथ पै सर्कल जवळील अनुसूचित जातीसाठी आरक्षित वार्डातील इच्छुकांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे देखील गहाळ झाली आहेत त्यामुळे त्यांनी देखील नाव समाविष्ट करा अशी मागणी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच महापालिकेची वार्ड निहाय मतदार यादी तयार करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले होते. तथापि मध्यंतरी कोरोनामुळे हे काम रखडले होते. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा वार्ड निहाय मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तथापि कोरोनामुळे घरोघरी जाऊन मतदार यादी तयार करण्यात आली नाही. त्यामुळेच मतदार यादीतून अनेकांची नांवे गायब होण्याचे प्रकार समोर येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे नागरिकांना घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.