एन अँड टी कंपनीने बेळगाव शहर पाणीपुरवठाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असली तरी त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे मनपा निवडणूक इच्छुक उमेदवारांची गैरसोय होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना आज घडली.
बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर झाले असून या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये वैयक्तिक उत्पन्नासह सर्व सरकारी कर भरल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
मनपा निवडणूक जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना पाणीपुरवठा मंडळाकडून म्हणजे आत्ताच्या एल अँड टी कंपनीकडून पाणीपट्टीची बाकी नसल्याचे प्रमाणपत्र अर्थात नो -ड्यू सर्टिफिकेट मिळणे आवश्यक आहे. सदर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आज सकाळपासून सदाशिवनगर येथील एल अँड टी पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयाच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.
तथापि एल अँड टी पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सकाळी 10 पासून सायंकाळी 4:30 -5 वाजेपर्यंत अवघ्या पाच जणांना नो -ड्यू सर्टिफिकेट मिळू शकले. त्याचप्रमाणे दुपारी 1 वाजता जेवणासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दुपारी 4 वाजले तरी पत्ता नव्हता असे समजते. त्यामुळे कार्यालयासमोर ताटकळत थांबून मनस्ताप सहन करावा लागल्याने उर्वरित बहुसंख्य इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. एल अँड टी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन पाहता त्यांना निवडणुकीचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत होते, असे सांगण्यात आले.
निवडणुकीसाठी वेळ कमी आहे आणि इच्छुक उमेदवार बहुसंख्य आहेत, जर या पद्धतीने दिवसाकाठी फक्त 5 जणांना सर्टीफिकीटं मिळू लागली तर अनेक जणांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची पाळी येणार आहे.
तेंव्हा मुख्य निवडणुक अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्याची ताकद द्यावी अशी मागणीही केली जात आहे.