कोरोना काळात जनतेला वैद्यकीय सेवेसाठी विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र योग्य नियोजनाद्वारे कणकुंबी परिसरातील 32 गावातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्याचे काम कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. कणकुंबी भागातील 45 वर्षावरील 90% जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.एकुण 25 हजार लोकसंख्ये पैकी बारा हजार जणांना आतापर्यंत देण्यात आली आहे,अशी माहिती कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. टी. चेतन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्या संदर्भात पुढे बोलताना डॉक्टर चेतन म्हणाले, कर्नाटक गोवा राज्यांच्या हद्दीवर असलेल्या,कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बत्तीस गावांचा समावेश आहे. यामधील 22 गावे डोंगर दर्यातील दुर्गम भागात आहेत. अनेक गावांना जाण्यासाठी चांगले रस्ते आदी सुविधाही नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात या गावांचा दोन ते तीन महिने संपर्कही तुटलेला असतो. अशा दुर्गम भागात चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.
युनायटेड सोशल वेल्फेअर संस्थेच्या सहकार्याने शासनाच्या आरोग्य बंधू सेवेअंतर्गत बत्तीस गावात गेल्या दीड वर्षांच्या कोरोना काळात जनतेला चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या सर्व आरोग्य सुविधा देण्याबरोबरच, गावोगावी जाऊन मोफत आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. आरोग्य शिबिर अंतर्गत गावकऱ्यांच्या आरोग्य चिकित्सा करून औषधे दिली जात आहेत.
गेल्या वर्षीपासून कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत 32 गावात केवळ186 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.चांगले वातावरण, चांगली जीवनशैली, चांगले आहारमान या भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ आहे. केवळ परराज्यातून आलेल्या लोकांमुळे या भागात कोरोनाचे संक्रमण झाले.
32 गावांपैकी 22 गावात नेटवर्क चा अभाव आहे. अशावेळी लसीकरण आणि कोव्हीड टेस्ट करण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते.
लसीकरण मोहिमेसाठी प्रत्येक गावात कोव्हिड टास्क फोर्स समिती नेमण्यात आली. आतापर्यंत दहा हजार जणांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली आहे. नऊ हजार जणांना कोरोना लसीचा पहिला डोस तर तीन हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दुर्गम भागात घरोघरी जाऊन गावकऱ्यांना लस देण्यात येत आहे.
कणकुंबी भागातील जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मुनियाळ, डॉक्टर आय.पी.गडाद तसेच खानापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे असेही डॉ. चेतन यांनी स्पष्ट केले. यावेळी सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट संदीप खन्नुकरही उपस्थित होते.