लेह-लडाखपासून कम्बाला केरळ येथील दऱ्याखोऱ्या मधील निसर्ग आणि मानवाच्या भावना टिपणे हे मला नेहमीच मोहित करत आले आहे, हे उस्फुर्त उद्गार आहेत बेळगाव येथील युवा सिनेमॅटोग्राफर श्वेत प्रिया हिचे. अगदी लहान वयापासून प्रियाने फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे.
शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत असताना श्वेत प्रियाने दांडेली येथे एका नाग सापाचा फोटो काढला होता. या पद्धतीने बालवयापासूनच तिला फोटोग्राफीची उत्कंठा आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात प्रियाने फोटोग्राफी संदर्भातील अनेक कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये प्रशंसनीय सहभाग दर्शविला आहे. आपल्या फावल्या वेळात तिला नवी ठिकाणे आणि प्रदेशात भ्रमंती करून जीवनाच्या वेगवेगळ्या छटा आणि भावना टिपून फोटो चित्रफितीमधून प्रकट करण्याची आवड आहे.
उत्साही प्रियाने उटी येथील लाईट अँड लाइफ अकॅडमीमधून फोटोग्राफीमधील मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केला असून इक्बाल मोहम्मद व अन्य मार्गदर्शकांकडून फोटोग्राफीमधील सखोल कौशल्य आत्मसात केले आहे. सिनेमॅटोग्राफी क्षेत्रामध्ये श्वेत प्रियाने आपली कारकीर्द घडविण्याची सुरुवात केली असून आपली अशी ओळख निर्माण केली आहे. आत्तापर्यंत तिने मुंबई, बेंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई येथील प्रतिष्ठित ब्रँड्ससाठी बऱ्याच ॲड फिल्मची निर्मिती केली आहे.
‘फोटोग्राफी म्हणजे साधी आणि सोपी कला आहे असे कांही लोकांना वाटते. परंतु फक्त बटन दाबूने म्हणजे फोटो काढणे नव्हे. परिणामकारक अचूक फोटो काढण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास असावा लागतो. फोटोग्राफी हा विषय असा आहे की जिथे आपण दररोज नवीन कांहीतरी शिकत असतो.
आपण एखाद्याचा फोटो काढत असताना इतर गोष्टींचेही निरीक्षण करत असतो. मी फार भाग्यवान आहे की मला सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता संतोष शिवण यांच्यासारख्या नामांकित सिनेमॅटोग्राफर यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. सिनेमॅटोग्राफी ही फोटोग्राफीपेक्षा वेगळी कला आहे, जिला अनेक पदर आहेत, असे श्वेत प्रिया सांगते.