बेळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस प्रशासकीय समितीच्या आज सोमवारी झालेल्या बैठकीत स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्यात आली असली तरी निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची का नाही? याबाबत मात्र बैठकीत शेवटपर्यंत निर्णय होऊ शकला नाही.
काँग्रेसच्या बेळगावातील स्थानिक नेत्यांशी माजी मंत्री एम. बी. पाटील बी के. हरिप्रसाद आदी प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी दोन तास चर्चा केली.
यावेळी स्थानिक नेते आणि माजी नगरसेवकांपैकी कांहींनी निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवावी असे तर काहींनी त्या विरोधात मत व्यक्त केले. परिणामी अखेरपर्यंत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत बैठकीत अंतीम निर्णय होऊ शकला नाही.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी बेळगाव महापालिका निवडणुकीसंदर्भात स्थानिक नेते व माजी नगरसेवकांची मते जाणून घेतली असता निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्याच्या निर्णयावर स्थानिक नेते व माजी नगरसेवकांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस कडून देखील 100 इच्छुकांनी अर्ज केले आहेत सदर बैठकीत मांडण्यात आलेली मते केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहेत. त्यानंतर उद्या किंवा परवा बेळगाव महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढवायची की नाही? याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.