बेळगाव महानगरपालिका निवडणुकीतील यश सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि भावी लढ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येक प्रभागातून एकच मराठी भाषिक उमेदवार द्यावा, असे कळकळीचे जाहीर आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकवार केले आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मराठी भाषिक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरले आहेत. एकेका प्रभागात अनेक मराठी भाषिक उमेदवार असल्याने मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहर सीमाभागाचे केंद्रबिंदू असल्याने येथील मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा डाव कर्नाटक सरकार पर्यायाने प्रशासनाने आखला आहे.
त्यासाठीच त्यांनी प्रभाग पुनर्रचना करून प्रभागांची तोडफोड करण्याबरोबरच वेगवेगळी आरक्षण लागू करण्याद्वारे आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न चालविला आहे. तेंव्हा अशा प्रसंगी मराठी उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांनी सजग राहून अत्यंत जबाबदारीने पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे.
मराठी भाषिक उमेदवारांमध्ये एकमत करून मराठी उमेदवारच निवडून आणण्यासाठी अनेक ठिकाणी स्थानिक पंच, प्रमुख नागरिक आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्यांना उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आपली एकजूट आणि निष्ठा दाखविण्यासाठी पंच मंडळी व प्रमुख नागरिकांनी आपापल्या प्रभागात यशस्वी मध्यस्थी करून मराठी भाषिक उमेदवार निवडून आणावेत.
कारण या महानगरपालिका निवडणुकीतील यश सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि भावी लढ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे जाहीर आवाहन मध्यवर्ती समितीतर्फे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे व राजाभाऊ पाटील यांनी केले आहे.