भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या दक्षिण विभागाचे उपयुक्त एस शिवकुमार यांची आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. सीमाभागात आमच्या भाषिक हक्क भंगाची दखल आयोगाने घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
अध्यक्ष दीपक दळवी,कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, महेश बिर्जे आणि पी आर ओ विकास कलघटगी यांनी हे निवेदन दिले आहे.
सीमाभागात मराठी भाषिकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. सर्वत्र कन्नड ची सक्ती करण्यात येत आहे. सर्व सरकारी कागदपत्रांचे कानडीकरण, शिक्षणात कन्नडची सक्ती केली जात आहे. याच बरोबरीने आता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पाठोपाठ पदवीचे शिक्षणही कन्नड मधून दिले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी मराठी,कन्नड आणि इंग्रजी भाषेत फलक लावले पाहिजेत मात्र फक्त कन्नड आणि इंग्रजी फलक लावून मराठीला अव्हेरले जात आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाचा स्वीकार करून आवश्यक त्या सूचना कर्नाटक सरकारला दिल्या जातील असे आश्वासन एस शिवकुमार यांनी दिले आहे.