बेळगाव महापालिका निवडणुकीचे उमेदवार निवडण्याचे अधिकार संबंधित प्रभागातील पंच आणि जाणकारांना दिले असल्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडून उमेदवाराचा अर्ज येत नाही, तोपर्यंत संबंधितांवर समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार नाही, असे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने महापालिका निवडणुकीसाठी विजयाच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार असावा यासाठी प्रभागातील पंच आणि जाणकारांनी एकच उमेदवार निवडावा असे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली असून आज सोमवार अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे.
त्यानंतर प्रत्येक प्रभागातून किती अर्ज दाखल घ्यावे याचे चित्र स्पष्ट होणार आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी समितीने रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेस येथे असलेल्या आपल्या मुख्य कार्यालयात मदत कक्ष सुरू केला आहे. त्याठिकाणी शंकानिरसन करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे.
म. ए. समितीने पंच व जाणकारांना उमेदवार निवडीचे आणि एकाच उमेदवाराचे नांव समितीकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे. प्रभागातील पंचांच्या निर्णयानंतर अधिकृत उमेदवार घोषित केला जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरलेल्या उमेदवारांनी नांवाची घोषणा होईपर्यंत सोशल मीडियावर अधिकृत उमेदवार असा चुकीचा प्रचार करू नये, असे आवाहन समितीने केले आहे.
जोपर्यंत एकाच उमेदवाराचे नांव निश्चित होत नाही तो पर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगळे यांनी दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे आदी उपस्थित होते.