गणेशोत्सव महामंडळ ,मंडळांची मागणी; खडेबाजार पोलीस तर्फे शांतता समिती बैठक – बेळगावच्या गणेशोत्सवला 125 वर्षाची परंपरा आहे. मात्र कोरोनाचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासन विविध नियम व अटी लादत आहे. कोणत्याही प्रकारची दडपशाही न करता सर्वांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यास परवानगी द्यावी . श्रीमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लहान मंडप उभारण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आली.
खडेबाजार पोलीस ठाण्यातर्फे शनिवारी (ता.7) समादेवी मंगल कार्यालयात महामंडळासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शांतता समिती बैठक झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासने लादलेल्या नियमावरील बद्दल नाराजी व्यक्त केली.
व्यासपीठावर खडेबाजारचे पोलीस निरीक्षण दिलीप निंबाळकर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव गणेश महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील ,उपाध्यक्ष सतीश गौरगोडा उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सौदागर यांनी स्वागत करून जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवबाबत जाहीर केलेल्या नियमावलीचे वाचन केले .महामंडळाचे जनसंपर्क प्रतिनिधी विकास कलघटगी यांनी गणेशोत्सवला प्रशासनाने जाचक नियम व अटी लादू नयेत शहरात एकूण 378 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून सर्व ठिकाणी मंदिरात श्रीमूर्ती प्रतिष्ठापना करणे शक्य नाही. याकरिता किमान 10 बाय 10 चा मंडप उभारण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही मंडप उभारण्यासाठी परवानगी द्यावी ,प्रशासनाने नियमावलि जाहीर करण्यास विलंब केला. तत्पूर्वीच श्रीमूर्ती बनविण्याची मूर्तिकारांना ऑर्डर दिली होती. त्यामुळे यंदा उंचीची मर्यादाही लादू नये, अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमावली नुसारच सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा कोणत्याही प्रकारे नियमावलीचे उल्लंघन होणार नाही. याची दक्षता घ्यावी ,असे आवाहन केले.