खासबाग येथील बहुचर्चित वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कायमस्वरूपी बंद करून त्याचा अहवाल अर्थात क्लोजर रिपोर्ट देण्याची सुचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बेळगाव महापालिकेला दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल सोमवारी झालेल्या शहरातील वैद्यकीय कचरा व प्रक्रिया प्रकल्पासंदर्भातील बैठकीमध्ये उपरोक्त सूचना देण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
तथापि कायद्यानुसार या प्रकल्पासाठी एक एकर जागा हवी. खासबाग येथील प्रकल्प हा केवळ अकरा गुंठे जागेत असल्यामुळे तेथे तो प्रकल्प पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी सांगितले. त्यावर तो प्रकल्प कायमस्वरूपी बंद करून त्याचा अहवाल देण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता महापालिकेकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय आता खासबाग प्रकल्प कायमस्वरूपी बंद होणार हे निश्चित झाले आहे.
खासबाग येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा यासाठी फेब्रुवारीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. तथापी महापालिकेने त्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही. त्या प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याने महापालिकेने त्याला टाळे ठोकले होते. परंतु आता तो प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्णय झाल्याने शहरातील रुग्णालयांना वैद्यकीय कचऱ्यासाठी पर्यायी प्रकल्पाची निवड करावी लागणार आहे.