पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 आगष्ट क्रांती दिनी हजारोंच्या संख्यने पत्रे लिहिण्याच्या मोहिमेस पाठिंबा देत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाच हजार पत्रे गावोगावी वितरित केली आहेत.
पत्रं मोहिमेत आता बेळगावसह सीमा भाग ढवळून निघाला आहे प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पंतप्रधानाना पाठवायच्या पत्रांची चर्चा चालू आहे.हजारो हात पत्र लिहिण्यासाठी सरसावले आहेत. धनंजय पाटील या खानापूर तालुक्याच्या युवकाच्या नेतृत्वाखाली पत्र मोहीम चालू झाली आणि अख्खा मराठी माणूस उसळून उठला.
मराठी माणसाचे शीर्ष नेतृत्व करणारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने या पत्र मोहिमेला पाठिंबा दिला आणि मराठी मावळा जागा झाला.कारवार ते मुंबई पर्यंत अनेक जण मराठी जण लढ्याचा भाग म्हणून पत्रं मोहिमेत सहभागी झाले आहेत.लोकशाही मार्गातून चाललेल्या या अभूतपूर्व आंदोलनास पाठिंबा देत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने दोन दिवस अगोदर पाच हजार पत्रं वाटली आहेत ,आणखी वाटली जाणार आहेत.9 आगष्टच्या क्रांती दिन हा बेळगावच्या लढ्यासाठी नवीन दिशा घेऊन येणार आहे.
शनिवारी तालुका समितीच्या बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पत्रं लढ्याची सर्व माहिती दिली आणि उपस्थितांनी पत्रं मोहीम जागृती करण्याचे आवाहन केले.
खानापूर तालुका समितीचे नेते विलास बेळगावकर यांनी क्रांती दिनी इतिहास घडतो असे सांगत पक्ष भेदाच्या भिंती गाडून मराठी माणसाने पत्रे लिहावी असे आवाहन केलं.जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी पुणे येथून लोकांना या मोहिमेत पत्र पाठवण्याचे आवाहन केले तर मुंबई हून काही मंडळींनी पत्रं पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला. कराड साताऱ्यातून गुंफण परिवाराचे अध्यक्ष बसवेश्वर चेनगे यांनीही पत्रे पाठवण्याचा मानस व्यक्त केला.
बेळगाव जिल्ह्याचा पाठीराखा कोल्हापूर जिल्हा भगव्या गर्जनेसह पत्र मोहिमेत उतरला आहे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर सहस्त्र पत्रे पाठवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.