पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे मंत्रिमंडळात सर्वांना प्रतिनिधित्व दिले. त्याप्रमाणे कर्नाटकात झालं पाहिजे. नव्या मंत्रिमंडळात मराठा समाजाला मंत्रीपद दिले गेले पाहिजे, असे स्पष्ट मत आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी व्यक्त केले आहे.
राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळ रचनेसंदर्भात आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, आज राज्यातील अनेक समुदाय भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर मराठा समाज आहे. तुम्ही त्यांना प्राधिकरण स्थापन करून देऊन मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची पूर्तता केलेली नाही.
तुम्हाला जे मत घालत नाहीत त्या अल्पसंख्यांकांना 1500 कोटी रुपये दिलेत. तब्बल 200 कोटी रुपये फक्त चर्चच्या दुरुस्तीसाठी दिलेत. मराठा मराठा समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असे यत्नाळ म्हणाले.
आज लिंगायत पंचमसाली समाजाला ‘अ’ वर्ग देण्यात आला नाही आदी बंजारा, कुडवक्कलीग यांना तो देण्यात आलेला नाही. खरंतर नव्या मंत्रिमंडळात मराठा समाजाला मंत्रीपद दिले गेले पाहिजे. यापूर्वी येडियुरप्पा यांनी मोठी चूक केली. त्यावेळी त्यांनी ममताज अली खान यांना मंत्रिपद दिले. मात्र त्यांच्यापासून काहीही फायदा झाला नाही. उलट खान भाजपला नांव ठेवून गेले. आमदार श्रीमंत पाटील मराठा समाजाचे आहेत ते नाहीतर बेळगावचे आमदार ॲड. अनिल बेनके हे आहेत.
यापैकी कोणाला तरी मंत्रिपद मिळाले पाहिजे. मराठा समाज, लिंगायत समाज, दलित समाज यांच्या उपजाती आहेत. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले आहे. कर्नाटका देखील तसे घडले पाहिजे आणि मगच पुढची चर्चा केली गेली पाहिजे, असेही आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी शेवटी सांगितले.