कर्नाटकचे एडीजीपी अर्थात अतिरिक्त पोलिस महासंचालक उमेश कुमार यांनी केलेल्या सूचनेनुसार दररोज कामानिमित्त कर्नाटकातून महाराष्ट्रात ये-जा करावी लागणाऱ्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून खास पास दिले जाणार आहेत.
एडीजीपी उमेश कुमार यांनी काल मंगळवारी निपाणी -कोगनोळी चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयांमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी जे तातडीच्या सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांचा चरितार्थ महाराष्ट्रात कामाला गेल्यामुळे चालतो अशा लोकांना कोरोना संदर्भातील अटींची पूर्तता करून खास पास वितरित करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार जिल्हा पोलिस प्रशासनाने संबंधित लोकांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ओलांडणे सुलभ व्हावे यासाठी पास वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थींना आरटी -पीसीआर चांचणी आणि लसीकरणाच्या पुर्ततेसह कांही अटींवर हे पास वितरित केले जाणार आहेत.
आम्ही कोरोना संदर्भातील नव्या आंतरराज्य मार्गदर्शक सूचीचे कठोर पालन करण्यास सुरुवात केली असली तरी अत्यावश्यक वस्तू -साहित्य किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच दररोज कामाला जाणारे चाकरमानी हे त्याला अपवाद असणार आहेत, असे एडीजीपी उमेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.