राज्यस्तरीय स्पर्धेसह विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या कावळेवाडी येथील होतकरू उदयोन्मुख धावपटू कु. प्रेम यल्लाप्पा बुरुड याला फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी नुकतीच क्रीडा साहित्याची मदत करून कौतुकाची थाप दिली.
बेळगाव येथील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर व त्यांचे मित्र वाय.पी.नाईक, राहुल पाटील, प्रमोद शर्मा हे बेळवट्टी गावी जात असताना कावळेवाडी गावचा धावपटू कु. प्रेम बुरुड हा धावण्याचा सराव करत होता. वाय.पी.नाईक यांनी हा गावातील छोटा धावपटू रोज या ठिकाणी सराव करत असल्याचे सांगितले. त्यावेळी लागलीच गाडी थांबवून चौकशी केली असता त्याचे वडील यल्लाप्पा बुरूड यांनी आपल्या मुलाची माहिती दिली.
गेल्या चार वर्षांत प्रेमने विविध ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. घरच्या बेताच्या खडतर परिस्थितीत एक मोठी जिद्द, चिकाटी ठेवून आपला मुलगा मोठा धावपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपडत असल्याचे यल्लाप्पा बुरुडे यांनी सांगितले. तेव्हा या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलसह पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी डीसीपी डाॅ. विक्रम आमटे आणि डॉ.देवदत्त देसाई (श्री प्रभा हॉस्पिटल) हे मदतीला धावून आले.
या सर्वांनी प्रेमला लागलीच बेळगावला बोलावून त्याला चांगल्या प्रतीचे दोन जोड स्पोर्ट्स शूज, दोन जोड स्पोर्ट्स ट्रॅक, दोन जोड मोजे व एक डाएट किट देऊन प्रोत्साहित केले. डॉ. विक्रम आमटे यांनी खास आपल्या कार्यालयात बोलावून प्रेमला कौतुकाची थाप दिली.
आपल्या मुलाच्या कौतुक पाहून भारावलेल्या यल्लाप्पा बुरुड यांनी प्रेमला भविष्यात पोलीस खात्यामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.प्रेम हा कावळेवाडी प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. पोलीस उपायुक्त आणि केलेले कौतुक आणि प्रेम ला मिळवून दिलेल्या मदतीबद्दल यल्लाप्पा बुरुड यांनी संतोष दरेकर व वाय. पी. नाईक यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.