विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. करिसिद्धाप्पा, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे आणि सीआयआय -इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलचे (आयजीबीसी) राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. सुरेश यांच्या पुढाकाराने शाश्वत बांधकाम वातावरणास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने बेळगावात सीआयआय -आयजीबीसी शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
बेळगावात सुरू करण्यात आलेली सीआयआय -इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलची शाखा ही देशातील 28 वी स्थानिक शाखा आहे. बेळगाव व्यतिरिक्त कर्नाटकात बेंगलोर, मंगळूर आणि म्हैसूर येथे सीआयआय -आयजीबीसीच्या शाखा आहेत. बेळगावातील सीआयआय -आयजीबीसीची शाखा शहर परिसरात हरित इमारत संकल्पनेची अंमलबजावणी आणि प्रोत्साहनासाठी भागधारकांच्या बरोबरीने कार्य करेल. तसेच या क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि नव्या संधी शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. बेळगाव येथील सीआयआय -आयजीबीसीच्या शाखेच्या शुभारंभाप्रसंगी सीआयआय -आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमीतसिंग अरोरा, आयजीबीसी कौशल्य विकास समितीचे चेअरमन व टोपोव्हान प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक के. श्रीराम, सीआयआय -आयजीबीसी बेंगलोर शाखेचे अध्यक्ष सईद मोहम्मद बेरे, मुख्य समुपदेशक एम. आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव येथील आयजीबीसी शाखेचे नेतृत्व सिनिकाचे संचालक राजेंद्र बेळगावकर आणि चैतन्य असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक व क्रेडाई कर्नाटकचे अध्यक्ष चैतन्य कुलकर्णी यांच्याकडे असणार आहे. शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांसह बेळगावकर व कुलकर्णी यांनी समयोचित विचार व्यक्त केले. बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी हरित आणि शाश्वत विकास ही काळाची गरज असल्याचे सांगून कणबर्गी येथील बुडाच्या 2700 घरांच्या निवासी प्रकल्पामध्ये हरित घरांची संकल्पना राबविण्याचे सूचित केले.
सीआयआयटे अंग असणारी आयजीबीसी ही कौन्सिल सध्या 21 व्या शतकातील हरित इमारत चळवळीचे नेतृत्व करत आहे. हरितक्रांती आणि हरित इमारत क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्वांपैकी एक बनविण्याच्या उद्देशाने 2001 साली या कौन्सिलची स्थापना झाली.
आयजीबीसी मान्यताप्राप्त हरित इमारतीचे अनेक फायदे आहेत. प्रामुख्याने या इमारतींमुळे 40 ते 50 टक्के विजेची कपात होते. तसेच पाण्याचीही 20 ते 30 टक्के बचत होते. वायुवीजनात वाढ (खेळती हवा) आणि लख्ख सूर्यप्रकाश पर्यायाने सुदृढ आरोग्य ही या इमारतींमधील रहिवाशांची उत्पादकता असणार आहे.