आसाम मिजोराम या पूर्वोत्तर राज्यात निर्माण झालेल्या सीमेवरील तणावानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत बेळगाव प्रश्नाचा उल्लेख केला होता त्यांनतर महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत तातडीने पाऊले उचलावीत यासाठी 9 आगष्ट क्रांतीदिनी मध्यवर्ती समिती पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विस्तृत पत्रं लिहित सीमा प्रश्नी दखल घ्यावी ही मागणी करणार आहे.
गुरुवारी सायंकाळी मराठा मंदिरात बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिपक दळवी होते.
बेळगावात होत असलेली भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली आणि मनपा समोरील हटवण्यात आलेल्या मराठी फलका विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ मनपा आयुक्त प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाची माहिती जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना देण्यात येणार आहे पुढील आठवड्यात समिती नेत्यांचे शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 11 हजार पत्रे लिहून सीमा प्रश्नाची दखल घ्यायला लावणे हा एक जनजागृती उपक्रम आहे त्यासाठी सर्वांनी पाठिंबा देत हजारो पत्रे लिहावीत असे आवाहन घटक समित्यांना करण्यात आले.बेळगाव शहरातून आणि तालुक्यातून हजारो पत्रे पाठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
एल आय पाटील यांनी येळ्ळूर गावं सीमा लढा आणि मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू आहे कन्नड प्राधिकरणाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूरच्या अस्मितेला डिवचू नये येळ्ळूर गाव जशास तसे उत्तर देईल असे सांगत कानडी सक्तीच्या वक्तव्याचा निषेध देखील या बैठकीत मांडण्यात आला.
मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी सीमा कक्ष समन्वय, सुप्रीम कोर्ट खटला वकील आणि महाराष्ट्र शासनाशी मध्यवर्ती समिती पाठपुरावा करत आहे मध्यवर्तीला केंद्र डावलून कुणीही संपर्क करत असेल तर तो निंदनीय आहे असे म्हटले या शिवाय समन्वयक मंत्री सीमा कक्षातील अधिकाऱ्यांनी बेळगावात येऊन चर्चा करावी या संदर्भात पत्र लिहिले असल्याची माहिती दिली.दर महिन्याला एक मध्यवर्तीने बैठक घ्यावी असा निर्णय झाला.सुरुवातीला समितीच्या निधन झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी खानापूर बेळगाव शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.