तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री डी. जयललिता यांच्या आप्त शशिकला नटराजन या बेंगलोरच्या परप्पण अग्रहार कारागृहात आहेत. त्यांना राज्यातिथ्य दिल्याच्या आरोपावरून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
बेळगाव शहरानजीक असलेल्या हिंडलगा कारागृहाशेजारील सरकारी कॉटर्समध्ये राहणाऱ्या कारागृह अधीक्षक कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर बेंगळूर एसीबी अधिकाऱ्यांच्या पथकाने आज बुधवारी सकाळी छापा टाकून तपास कार्य हाती घेतले. या कारवाईत बेंगलोरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक एसीबी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कृष्णकुमार हे यापूर्वी बेंगलोरच्या परप्पण अग्रहार कारागृहाचे अधीक्षक होते. त्यावेळी त्यांनी शशिकला नटराजन यांचे राज्यातिथ्य केल्याची तक्रार आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी 2018 मध्ये केली होती.
या संदर्भातील तपासाचा भाग म्हणून आज कृष्णकुमार यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. तथापि मिळालेल्या माहितीनुसार या छाप्यामध्ये एसीबी अधिकार्यांना कोणतीही खास माहिती सापडू शकले नाही. तसेच अवैधरित्या संपत्ती जमा केल्याचा कोणताही पुरावा त्यांच्या हाती लागला नसल्याचे समजते.