बेळगाव महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारावर राज्य निवडणूक आयोगाने कांही निर्बंध घातले असून उमेदवारांसह 5 पेक्षा अधिक लोकांना प्रचारात सहभागी होता येणार नाही.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमध्ये उमेदवारांना घरोघरी जाऊन आणि सर्वत्र प्रचारासाठी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात उमेदवारांना आपल्यासह 5 जणांपेक्षा जास्त लोकांना सोबत घेऊन प्रचार करता येणार नाही.
प्रचारात सहभागी सर्वांनी फेसमास्क घालण्याबरोबरच सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे लागेल. प्रचारासाठी वाहन वापरू नये आणि समूहाने प्रचार करू नये. उमेदवारांना वृत्तपत्र माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचार करता येईल. मात्र त्यासंबंधीचा तपशील द्यावा लागेल.
उमेदवार आणि समर्थकांनी फेसमास्क वापरणे सक्तीचे असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
मनपा निवडणूक: जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी निवडणूक कार्यालयांना दिली भेट
जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराभोवती उभारलेल्या नामनिर्देशन केंद्रांना भेट दिली.
त्यांनी विश्वेश्वरैया नगर, गोवावेस कार्यालय, कोनवाळ गल्ली आणि अशोक नगर केंद्रांना भेट दिली.
नामांकन करताना गोंधळ होऊ नये म्हणून शहराच्या विविध भागात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित प्रभागातील उमेदवारांच्या सोयीसाठी जवळच्या केंद्रांवर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, कोविड मार्गदर्शक तत्त्वे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
लक्ष्मी निपाणीकर आणि इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते.