Friday, December 20, 2024

/

एकच उमेदवार काळाची गरज : ‘यांनी’ केले जाहीर आवाहन

 belgaum

सीमाप्रश्नाची सोडवणुक आणि बेळगाव महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी आपापसातील हेवेदावे विसरून येत्या मनपा निवडणुक रिंगणात सर्वानुमते प्रत्येक प्रभागातून एकच मराठी भाषिक उमेदवार द्यावा, असे कळकळीचे जाहीर आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केले आहे.

बेळगाव महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातून समंजसपणे एकच उमेदवार देणे ही काळाची गरज आहे असे सांगून यासंदर्भात जाहीर आवाहन करताना रेणु किल्लेकर म्हणाल्या की, बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवायचा असेल तर प्रत्येक प्रभागात एकच मराठी भाषिक उमेदवार देणे अत्यावश्यक आहे. मी महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवार होण्यासाठी महिला आघाडीतर्फे प्रयत्न करणार आहे. तथापि या निवडणुकीमध्ये एकास एक उमेदवार असेल यासाठी महिला आघाडी प्रयत्नशील राहील.

त्यामुळे ज्या -ज्या ठिकाणी महिलांसाठी प्रभाग राखीव आहेत, त्या -त्या ठिकाणी जर अनेक उमेदवार असतील तर माझी विनंती आहे की सर्वांनी संघटित होऊन एकमताने एकच उमेदवार द्यावा. गरज पडल्यास आम्हाला हाक द्यावी. आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ. मी स्वतः तुमच्यामधून एक उमेदवार कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करेन, असेही किल्लेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रीय पक्ष महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेंव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा महापालिकेवर फडकावणे काळाची गरज बनली आहे. कारण सीमाप्रश्न अद्याप भिजत पडलेला आहे. त्यादृष्टीने महापालिकेवर म. ए. समितीचे वर्चस्व असणे अत्यावश्यक आहे.

तेंव्हा माझी समस्त मतदार बंधू-भगिनींना कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपले हेवेदावे सोडून आपण आपल्या समितीच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्याला विजयी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.